पुणे | बबलू ( राज ) राठोड
पुण्यातील खराडी परिसरात कौटुंबिक वादाने अत्यंत भीषण
वळण घेत एका विवाहित महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (२४ जून) पहाटे उघडकीस आली. झोपेत असलेल्या पत्नीच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करत तिचे नाक आणि कान कापून पतीने अमानुषपणे हत्या केली. या घटनेनंतर आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला असून खराडी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली आहे.
मृत महिलेचे नाव किरण दयाराम बाबर (वय ३२) असून ती खराडीतील भनगाई वस्ती येथे वास्तव्यास होती. या प्रकरणी तिचा पती दयाराम तोताराम बाबर (वय ३६) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद किरणचा भाऊ दादू सजन बोरसे यांनी खराडी पोलीस ठाण्यात दिली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दयाराम बाबर घंटागाडीवर काम करत होता, तर किरण घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. दाम्पत्याला चार मुले असून कर्जबाजारीपणा आणि पतीच्या दारूच्या व्यसनामुळे घरात सतत वाद होत होते. याच वादातून बुधवारी पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास, पत्नी गाढ झोपेत असताना आरोपीने तिच्यावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला केला. गळ्यावर वार केल्यानंतर तिचे नाक आणि कानही कापल्याने ती गंभीर जखमी झाली.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या किरणला तिचा भाऊ तातडीने रुग्णालयात घेऊन गेला. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
घटनेनंतर आरोपी दयाराम बाबर फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी सांगितले की, कर्जाच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होत होते आणि त्यातूनच हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
0 Comments