पुणे -कोंढवा येथे एटीएस(ATS) कडूनबेकायदेशीर पद्धतीने चालवल्या जात असलेल्या 'बनावट टेलिफोन एक्सचेंज'चा पर्दाफाश करण्यात आला आहे.

पुणे क्राईम बीट:-बेकायदेशीर पद्धतीने चालवल्या जात असलेल्या 'बनावट टेलिफोन एक्सचेंज'चा एटीएस कडून पर्दाफाश करण्यात आला आहे. याठिकाणावरुन एकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. एटीएसच्या पथकाने तब्बल ३ हजार ७८८ सीमकार्डसह संत सीम बॉक्स, वायफाय आणि सीमबॉक्स चालवण्याकरिता लागणाऱ्या अँटिना तसेच लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त केला आहे. 

नौशाद अहमद सिद्धीकी (वय ३२, रा. कोंढवा) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. विदेशातून भारतात येणारे इंटरनॅशनल कॉल भारतातील यंत्रणेला समजू न देण्यासाठी बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटरचा वापर केला जात होता. त्याकरिता या सीमकार्डचा वापर केला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. कोंढवा येथील मीठानगरमध्ये असलेल्या 'एमए कॉम्प्लेक्स' परिसरात हे बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर चालवले जात होते. दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या नौषादकडे कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

त्याने हे सीमकार्ड कुठून आणले? त्याला कोणत्या वितरकाने हे सीमकार्ड पुरवले, भारतीय यंत्रणांना विदेशातून येणारे कॉल समजू नयेत याकरिता वापरली जाणारी यंत्रणा त्याने कशी उभी केली? त्याने याचे प्रशिक्षण कुठे घेतले? त्याला या कामासाठी कोणी कोणी आर्थिक मदत केली? कोंढवा येथे जागा कोणी व कशी दिली? ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित तरुणाची पार्श्वभूमी काय आहे याबाबत कसून तपास केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. आगामी महिन्यात मोठ्या प्रमाणावर सण आणि उत्सव असतात. त्या पार्श्वभूमीवर शहरात येणाऱ्या नागरिकांची संख्याही अधिक असते. बाजारपेठा गजबजलेल्या असतात. सुरक्षेच्या अनुषंगाने यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. 

ही कारवाई दहशतवाद विरोधी पथक पुणे युनिट Pune ATS यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. 
आपल्या परिसरात असे अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज सुरु असल्यास स्थानिक पोलीस ठाणे किंवा एटीएसशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments