जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदार संघात मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज- जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे


पुणे, दि. ३१: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकींतर्गत जिल्ह्यातील सर्व चार लोकसभा मतदार संघाची मतमोजणी येत्या ४ जून रोजी होत असून मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.

डॉ. दिवसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, रोहिदास पवार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित होते.

बारामती आणि पुणे लोकसभा मतदार संघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामामध्ये, शिरुर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी रांजणगाव, ता. शिरुर येथील महाराष्ट्र औद्योगिक वखार महामंडळाच्या गोदामामध्ये तर मावळ लोकसभा मतदार संघाची मतमोजणी शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये होणार आहे.

सकाळी ईव्हीएम यंत्रे आणि टपाली मतपेट्या ठेवलेल्या सुरक्षा कक्षांचे (स्ट्राँग रुम) सील निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी आदी तसेच उमेदवार आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत काढल्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया करुन मतमोजणीला प्रारंभ केला जाईल. प्रारंभी सकाळी ८ वाजता टपाली मतदान आणि ईटीपीबीएस मतांची मोजणी सुरू होईल. 

ईव्हीएमच्या मतमोजणीची सुरूवात ८ वाजून ३० मिनिटांनी  होईल. मतमोजणी कक्षातील सर्व कामकाजाचे सीसीटीव्हीद्वारे संपूर्ण रेकॉर्डिंग करण्यात येणार असून याशिवाय व्हिडीओ कॅमेराद्वारेही चित्रीकरण करण्यात येणार आहे.

मतमोजणी केंद्रात मोबाईलआणण्यास मनाई

निवडणूकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनीक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाईल. मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल सोबत बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. वैध ओळखपत्र नसलेल्या कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.


याशिवाय सदर दिवशी वाहतुकीला अडथळा येऊन वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक वळविण्याचे आदेश पोलीस प्रशासनास दिले आहेत. मतमोजणीसाठी येणाऱ्या सर्व घटकांना कोणतीही असुविधा होणार नाही यासाठी निवडणूक प्रशासन सर्व ती काळजी घेत असून नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ. दिवसे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments