महाराष्ट्र कारागृह विभाग राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धेचा उदघाटन सोहळा दिनांक १२.०२.२०२४ (सोमवार)


महाराष्ट्र कारागृह विभागामार्फत कारागृहातील अधिकारी / कर्मचारी यांचेकरीता राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. महाराष्ट्र कारागृह विभागाचे एकुण पाच विभाग असुन विभागीय स्तरावरुन विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. या विभागीय क्रीडा स्पर्धामध्ये ज्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे अथवा जे खेळाडु विजेते आहेत अशा खेळाडुंकरीता दरवर्षी मुख्यालय स्तरावरुन वार्षिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. सदर राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धाचे आयोजन दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविदयालय, येरवडा, पुणे येथे करण्यात येते. सन २०२३-२०२४ च्या राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धाचे उदघाटन दिनांक १२.०२.२०२४ रोजी मा. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) श्री अमिताभ गुप्ता यांचे शुभहस्ते व मा. विशेष पोलीस महानिरीक्षक (मुख्यालय) डॉ. जालिंदर सुपेकर, मा. कारागृह उपमहानिरीक्षक (पश्चिम विभाग) तथा राज्यस्तरीय क्रीडा समितीच्या अध्यक्षा श्रीमती स्वाती साठे तसेच मा. श्रीमती जुगनु गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी मा. श्री अमिताभ गुप्ता व मा. श्रीमती स्वाती साठे यांनी उपस्थित सर्व खेळाडुंना मार्गदर्शन केले. उदघाटन सोहळया प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरुष व महिला खेळाडूंच्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या.
दिनांक १२.०२.२०२४ ते १६.०२.२०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये पुणे विभाग, मुंबई विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, नाशिक विभाग व नागपूर विभागातील जवळपास २२० खेळाडुंनी सहभाग घेतलेला असुन या स्पर्धामध्ये पुरुष व महिला खेळाडूंसाठी १०० मी धावणे, २०० मीटर धावणे, ८०० मीटर धावणे, रिले, थाळीफेक, भालाफेक, गोळाफेक, लांबउडी, कराटे, कुस्ती, बॅडमिंटन एकेरी, रिंगटेनिस एकेरी हे वैयक्तिक खेळ तसेच कबडडी, व्हॉलीबॉल, रस्साखेच या सांघिक खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे. मा. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) श्री अमिताभ गुप्ता यांचे संकल्पनेतुन सन २०२४ या वर्षापासुन क्रिकेट या खेळाचा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे,

त्यामुळे सर्व खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. शारीरीक व मानसिक स्वास्थ निरोगी राहण्याकरीता खेळाला मानवी जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. खेळामुळे संघभावना वाढीस लागून खेळाडुमध्ये शिस्त आणि कामाचा उत्साह वाढीस लागतो. त्याचबरोबर शारीरीक व मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन होऊन एकाग्रता सुधारण्यास मदत होते. निरोगी खेळाडु हे निरोगी समाज घडवतात आणि निरोगी समाज निरोगी देश घडवतो, याच प्रमुख उददेशाने कारागृहातील अधिकारी / कर्मचारी यांच्यामध्ये असलेल्या क्रीडा कौशल्यांना वाव मिळावा, त्यांच्या मध्ये संघभावना वाढीस लागावी व दैनंदीन कामकाजाच्या ताणतणावातुन विरंगुळा मिळावा याकरीता विभागीय व राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.

सदरच्या उदघाटन सोहळयाकरीता मा. कारागृह उपमहानिरीक्षक (मुंबई विभाग) श्री योगेश देसाई, दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविदयालयाचे प्राचार्य श्री नितीन वायचळ, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक श्री सुनिल ढमाळ, नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक श्री वैभव आगे, येरवडा खुले कारागृहाचे अधीक्षक श्री अनिल खामकर तसेच इतर कारागृहांचे अधीक्षक, अधिकारी, कर्मचारी तसेच खेळाडु उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments