पुणे शहरातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये गावठी हातभट्टी दारुचे गुन्हे करणारी अट्टल महिला गुन्हेगार महिला अभिलेखावरील सराईत महिला गुन्हेगार आहे. तीने तीच्या साथीदारांसह लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गावठी हातभट्टी दारु तयार करणे, विक्री करणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षामध्ये तीचेविरूध्द ०४ गुन्हे दाखल आहेत. तीच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील नागरीकांच्या आरोग्यास व जीवीतास धोका निर्माण होवून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच तीचे दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.
लोणी-काळभोर पोलीस स्टेशन यांनी सादर केलेला प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार यांनी नमूद महिला हिचे विरुध्द एम.पी.डी.ए. कायद्यान्वये ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले असुन तीस कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे. नमूद महीलेस स्थानबध्द करण्यामध्ये श्री. दत्तात्रय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर व श्री. ए. टी. खोबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी. सी. बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी कामगिरी पार पाडली.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी दहशत निर्माण करणाऱ्या तसेच अवैध बेकायदेशीर हातभट्टी दारु, ताडी निर्मीती व विक्री करणा-या अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. मा. पोलीस आयुक्त यांनी कार्यभार स्विकारल्यानंतरची एम.पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची ही ४१ वी कारवाई असुन, यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.
0 Comments